रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही तालुक्यांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील व्यापाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने बंद ठेवण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. मात्र, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी स्वेच्छेने दुकाने बंद ठेऊ शकतात, असेही ठरविण्यात आले.काही तालुक्यांमधून स्थानिक व्यापारी बांधवांनी एकत्र येऊन निर्णय घेत तेथील स्थानिक बाजारपेठ काही दिवस बंद ठेवून कोरोनाची ह्यब्रेक द चेनह्ण करण्याचा प्रयोग राबविला आहे. त्यांच्या भूमिकेचा विचार करून रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांशी अशा प्रयोगाबाबत विचारविनिमय करण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक पार पडली.या बैठकीमध्ये सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांचा विचार करण्यात आला. या बैठकीमध्ये हजर असलेल्या सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने यापूर्वी सुमारे ३ महिने बंद ठेवून मोठं नुकसान करून घेतल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आता पुन्हा दुकाने बंद ठेवून आणखी नुकसान सहन करण्याची व्यापाऱ्यांची ताकद नसल्याने रत्नागिरी शहरातील व्यापाऱ्यांनी एकमताने आपली दुकाने बंद ठेवण्यास स्पष्टपणे नकार दर्शविला आहे. ज्या व्यापाऱ्यांना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवायची असल्यास ते व्यापारी आपली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवू शकतात.
जे व्यापारी आपली दुकाने नेहमीप्रमाणे सुरू ठेवणार आहेत, त्यांनी शासनाच्या सर्व नियमांचे म्हणजेच सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, शासनाने दिलेल्या वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता दुकाने बंद करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास सदर व्यापाऱ्यांवर शासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल.- उदय पेठे, अध्यक्ष,रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ