रत्नागिरी : जनता कर्फ्यूला रविवारी १०० टक्के प्रतिसाद देणाऱ्या रत्नागिरीकरांनी सोमवारी मात्र बेपर्वाईचे दर्शन घडविले. ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतरही रत्नागिरीत सोमवारी सकाळपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे.
सगळीकडे १४४ कलम लागू असल्याने गर्दी होऊ नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून मोठी कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. सकाळपासून केवळ तीन तासात पोलिसांनी जवळजवळ ६०० वाहन चालकांवर कारवाई केली.रविवारी जनता कर्फ्यूला रत्नागिरीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवार असल्याने बहुतांशी लोक घराबाहेर पडलीच नव्हती. त्यामुळे सर्वत्र सामसूम होते. लोकांची गर्दी होऊ नये यासाठी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाचे गांभीर्य रत्नागिरीकरांना नसल्याचे दिसून आले.
लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन करूनही अनेकजण सकाळी घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेकजण फिरायला बाहेर पडल्याचेही विदारक चित्र पाहायला मिळाले. अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आलेली असतानाही अनेकजण बेफिकीरपणे विनाकारण घराबाहेर पडले होते.कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडलेल्या सर्वांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. वाहनचालकांना थांबवून त्यांना विचारणा करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी वाहन्यांची तपासली पोलिसांकडून होत असल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.रत्नागिरी शहरात सोमवारी सकाळी तब्बल ६०० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. लोकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन करुन सुध्दा लोक गर्दी करु लागलेत. त्याचबरोबर नियम धाब्यावर बसवून रत्नागिरी शहरातील गाडीतळ, परटवणे एस्. टी. स्टॅण्ड, आठवडा बाजार, मारुती मंदिर, नाचणे - गोडावून स्टॉप या परिसरात सर्वच रिक्षा थांब्यावर रिक्षा व्यवसाय सुरू आहेत.शहरातील सर्व रिक्षा वाहतूक तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार रिक्षाचालकांवरही कारवाई करण्याचे संकेत देण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात सुरू त्यामुळे आता पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरी लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.