रत्नागिरी : मुंबईतील नागरिकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हात पुढे केला आहे. एस्. टी. अनेक संकटातून जात आहे. लालपरीतून या कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांच्या घरापासून कामाच्या ठिकाणी व तेथून पुन्हा घरी सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे. राज्यातील विविध विभागातील ८६ चालक - वाहक मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी विभागातील सहाजणांचा समावेश आहे. लवकरच आणखी काहीजण मुंबईकडे कूच करणार आहेत.कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर घोंघावत आहे. मुंबई शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तरीदेखील अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे या तिन्ही विभागातील कर्मचारी गावाला निघून गेल्यामुळे एस्. टी. महामंडळाने चालक आणि वाहकांची कमतरता भासू नये, यासाठी सोलापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक विभागाचे एस्. टी.चे चालक आणि वाहकांना बोलावले आहे.
लॉकडाऊनमुळे संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असतानाच लालपरीचे कर्मचारी आपली सेवा देण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. रायगड विभागातील २०, सातारा विभाग १६, रत्नागिरी ६, सोलापूर विभाग २३ आणि नाशिक विभाग २१, असे एकूण ८७ एस्. टी.चे वाहक आणि चालक मुंबईकडे रवाना झाले आहेत. लवकरच रत्नागिरी विभागातील आणखी १५ जणांची टीम मुंबईकडे रवाना होणार आहे. शासकीय आदेशाचे पालन करीत आवश्यक ते पास घेऊनच मंडळी सेवा बजावण्यासाठी मुंबईकडे कूच करणार आहेत.कोरोनामुळे उद्भवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत रत्नागिरी विभागातील सहाजण मुंबईत पोहोचले आहेत. त्यामध्ये राजापूर आगारातील चालक तथा वाहक दत्तात्रय दादाराव पांचारे, चालक तथा वाहक सिध्दार्थ अरूण लांडगे आणि चालक सचिन रामराव वळगे, दापोली आगारातील चालक यु. पी. टापरे, ए. एच्. पाटील आणि गुहागर आगारातील चालक तथा वाहक प्रवीण संतोष जाधव यांचा समावेश आहे.या चालक - वाहकांकडे मुंबईत वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, पनवेल, वाशी, मुंबई महापालिका हद्दीतील शहरी वाहतूक करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे चालक - वाहक शेकडो किलोमीटर अंतरावरून मुंबईकडे रवाना झाले आहेत. एस्. टी.ने संकटसमयी धावून जाण्याचे मनोधैर्य दाखविल्याने चालक- वाहक तसेच त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या एस्. टी.च्या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.विशेष वाहतूककोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा कार्यरत आहेत. त्यामध्ये डॉक्टर्स, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांची वाहतूक सुविधा एस्. टी. महामंडळाकडे दिली आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागातर्फे शासनाच्या आदेशानुसार विशेष वाहतूक सुरू करण्यात येत आहे.