अनिल कासारे लांजा : लॉकडाऊन कालावधीत दळणवळणाची सर्व साधने ठप्प झाली. रिक्षा व्यवसायही सुरु नसल्याने संसाराचा गाडा पुढे कसा हाकायचा या विवंचनेत सापडलेल्या कुर्णे येथील रिक्षा व्यावसायिक राजाराम सीताराम गुरव यांनी गावातील प्रत्येक वाडीत जाऊन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला आणि उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला.लॉकडाऊन काळात पास असल्याशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव केला गेला. यामुळे रिक्षा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. रिक्षा व्यवसाय हा हातावर पोट असलेला व्यवसाय आहे. भाडे मिळाले तर पैसा, नाहीतर दिवसभर रिक्षा थांब्यावर ग्राहकाची वाट बघत बसावे लागते.
राजाराम गुरव यांची स्थितीही वेगळी नव्हती. पंधरा दिवस कसेबसे गेले. त्यानंतर मात्र पैशांची चणचण भासू लागली. काहीतरी करायला हवे, हे लक्षात येत होते. पण करायचे काय, हे समजत नव्हते. पण गुरव यांनी हार मानली नाही.शेतीच्या कामासाठी त्यांनी शासकीय पास काढला आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करायचा, असा मनाशी निश्चय केला. लांजा शहरात रिक्षा व्यवसाय करत असल्याने ओळख होतीच. याचा फायदा घेत गावातील लोकांनाच भाजीपाल्याची सुविधा द्यायची तयारी केली.सर्व प्रकारचे दळणवळण बंद असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत होते. त्यांना भाजीपाल्याची सेवा घरपोच दिली तर त्यांची गैरसोय दूर होईल. त्यासाठी शेतीचा वाहतूक पास होताच. त्यामुळे राजाराम गुरव यांनी आपल्या रिक्षामध्ये भाजीपाला भरून वाडीमध्ये जाऊन विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यांना गावातील लोकांनीही चागला प्रतिसाद दिला.तालुक्यात अजूनही म्हणावी तशी एस. टी. सेवा सुरळीत झालेली नाही. त्यामुळे गावातील लोकांच्या सोयीसाठी राजाराम गुरव यांनी हा भाजी व्यवसाय ना नफा ना तोटा या तत्त्वावर सुरू केला आहे. सर्वसामान्य लोकांना लांजा येथे जाऊन भाजीपाला घेणे परवडणारे नाही. तीच भाजी वाजवी दरात उपलब्ध करून देण्याचे काम गेले साडेचार महिने ते करीत आहेत.आठवड्याचे दोन ते तीन दिवस गावातील वाड्यांमध्ये जाऊन भाजी विक्री व इतर दिवशी रिक्षा व्यावसाय करतात. एस. टी.सह दळणवळणाची इतर साधने सुरू होत नाहीत तोपर्यंत हा व्यवसाय सुरू ठेवण्याचा त्यांचा मनोदय आहे.