शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील कोविड सेंटर्समध्ये डॉक्टरांसह अन्य कर्मचारी तसेच औषधसाठा तैनात ठेवण्यात आला आहे.गणेशोत्सव काळात जिल्ह्यात आलेल्या मुंबईकरांमुळे कोरोना रुग्णांची संख्या भरमसाठ वाढली. सप्टेंबर महिन्यातच केवळ साडेतीन हजार रुग्णांची भर पडली, तर १२८ जणांचे मृत्यू झाले. जागतिक स्तरावर आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे.
दिल्लीतही याची सुरूवात झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्वाधिक रुग्ण वाढले असता ज्या पद्धतीने सज्जता ठेवण्यात आली होती. त्या प्रकारे सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स अन्य कर्मचारी आणि औषधसाठा यांची संपूर्ण उपलब्धता ठेवण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत.दिवाळीच्या कालावधीत जिल्ह्यात मुंबई, पुणे आदी शहरांमधून आलेल्यांची संख्या जास्त होती. त्यातच आता हिवाळी पर्यटन हंगाम असल्याने पर्यटकही येऊ लागले आहेत. सगळीकडे आता अनलॉक झाल्याने सर्व बाबतीत शिथीलता आली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याच्या दृष्टीनेही जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ॲंटिजेन तसेच आरटीपीसीआर या कोरोनाविषयक चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरोनाबाबत आरोग्य विभाग सजग रहात आहे.लाट येऊ नये म्हणून...कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातही तपासणी केली जात आहे. ग्रामीण भागात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची मोबाईल टीमच्या माध्यमातून तपासणी सुरू आहे.
शाळा - महाविद्यालये सुरू होणार असल्याने शिक्षकांचीही कोरोना चाचणी केली जात आहे. त्याचप्रमाणे भाजी, फळे, किराणा आदींच्या विक्रीतूनही कोरोना पसरण्याचा धोका लक्षात घेऊन या विक्रेत्यांची तपासणी सुरू होत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.सेंटर, डॉक्टर्स, औषधांचा वाढीव साठादिवाळीत झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार, हे लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा पुरेशी कोविड सेंटर्स, पुरेशा खाटांसह सुसज्ज आहे. डॉक्टर्स यांच्यासह पुरेसा कर्मचारीवर्ग आणि औषधे यांचीही उपलब्धता आहे.
गणेशोत्सव काळात रूग्ण वाढले असता ज्याप्रमाणे रूग्णालये, डॉक्टर्स, कर्मचारी तसेच औषधसाठा आणि कोविड रूग्णालये सज्ज होती, त्याप्रमाणे यावेळीही तशीच तयारी ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.- लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी