रत्नागिरी : सध्या कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या परिचारिका, वाॅर्डबाॅय यांना समाजातील काही लोकांकडूनच बहिष्कृत केले जाण्याचे प्रकार घडत असून काहींना तर भाड्याने राहात असलेल्या खोल्या साेडण्याची वेळ येत आहे. प्रत्यक्ष कोरोना योद्ध्यांवर ही वेळ आल्याने त्यांच्या निवासाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाशी लढा देणाऱ्या या योद्ध्यांचे मनोबल खचू लागले असून त्यांना समाजाच्या पाठबळाची गरज आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय तसेच महिला रुग्णालयात काम करणारे परिचारक - परिचारिका, वाॅर्डबाॅय यांच्यापैकी काही कर्मचारी शहरात किंवा परिसरात भाड्याच्या खोलीत राहात आहेत. मात्र, स्वत: धोका पत्करून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडे अतिशय हिणकस नजरेने पाहिले जात आहे. भाड्याने खोली घेतल्यानंतर हे कर्मचारी आरोग्य विभागात काम करीत असल्याचे कळल्यानंतर अनेक जागा मालकांनी या कर्मचाऱ्यांना तत्काळ खोली सोडण्यास सांगितल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या संकटात ऐनवेळी कुठे राहायला जायचे, ही चिंता या कर्मचाऱ्यांना सतावत आहे.
सध्या कोरोना रुग्णांना त्यांचे नातेवाईकही नाकारतात. त्यामुळे त्यांची सेवा धोका पत्करून हे आरोग्य कर्मचारी करीत असतात. वृद्ध किंवा गंभीर असलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात राहण्याचा धाेका असूनही हे कर्मचारी दिवसरात्र या रुग्णांची सेवा करतात. त्यांना खाऊपिऊ घालतात. त्यांना आंघोळ घालणे, अगदी डायपर बदलणे, त्यांच्या बेडशीट्स बदलणे आदी कामे हे कर्मचारी करत असतात. मात्र, समाजातील काही लोकांकडून या कर्मचाऱ्यांना विचित्र वागणूक दिली जात आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालयातील काही वाॅर्डबाॅय तसेच परिचारिका यांना नोकरीही सोडावी लागली आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काही कुटुंबातील अनेक सदस्य बाधित होत आहेत. अशांची सेवा कुठल्याही प्रकारची भीती किंवा घृणा न बाळगता हे कर्मचारी करीत आहेत. असे असताना आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा आपण स्वत: कोरोनाबाधित झाल्यावर रुग्णालयात जायची वेळ आली तर कुणाची सेवा घेणार, हा विचार न करता, या कर्मचाऱ्यांना काही व्यक्ती भाड्याने दिलेल्या खोल्या खाली करायला लावत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रुग्णवाहिकेलाही मनाई
उद्यमनगर येथील महिला रुग्णालयात गेल्या वर्षापासून कोरोना रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, या मार्गावर असलेल्या रहिवाशांकडूनही या मार्गावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकांना मनाई करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर या मार्गावरून पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वाटेत अडवून त्यांना दुसऱ्या रस्त्याने जायचे, असे दरडावण्याचे प्रकारही घडत असल्याचे काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.