चिपळूण : तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्याचा निर्धार सोमवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्यानंतर आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम यांनी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलीस पाटलांशी ऑनलाईन संवाद साधला आणि आपापल्या गावात कोरोनाचे निर्मूलन करण्यासाठी साद घातली. त्याला सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कोरोनाला गावच्या सीमेच्या आत येऊ देणार नाही, असे काम करण्याची तयारी दर्शवली.
राज्याच्या अन्य भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र तो दिवसागणिक वाढतच आहे. किंबहुना कोरोनाची लागण होण्यामध्ये जिल्हा राज्यात दुसऱ्या कमांकावर आहे. जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याचबरोबर बळींची संख्याही वाढत असल्याने आमदार जाधव हे गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा घेत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने त्यांनी आमदार निकम यांच्याशी संपर्क साधून तत्काळ सर्व खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवाव्या लागतील, याची माहिती त्यांच्याकडून घेतली. त्या उपाययोजना आणि गावागावातच कोरोनाचा अटकाव करणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष यांच्याशी संवाद साधण्याचे ठरविले. त्यानुसार मंगळवारी ऑनलाईन बैठक घेण्यात आली.
१०० हून अधिक गावातील प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी ग्राम कृती दले पुन्हा कार्यरत करणे आणि पहिल्या लाटेच्यावेळी जसे काम कृती दलांनी केले, तसे काम करण्याची गरज असल्याचे आमदार जाधव व निकम यांनी सर्वांना पटवून दिले. तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाला कृती दलाचा अध्यक्ष करावा. एखाद्या गावात कृती दल चांगल्या प्रकारे कार्यरत असेल तर त्यांनी ते कायम ठेवावे किंवा गावाने एकत्रितपणे सर्वानुमते कृती दलाचा अध्यक्ष निवडला तरी चालेल. पण, आता फार कडक धोरण ग्राम कृती दलांनाच घ्यावे लागेल. आपल्या गावात कोरोनाचा रूग्ण आढळल्यास त्याचा संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी जे जे करावे लागेल ते कृती दलांनी करावे, अशा सूचना जाधव यांनी दिल्या. त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, प्रांताधिकारी प्रवीण पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यही या बैठकीत सहभागी झाले होते.