मंडणगड : कोरोनापासून दूर असलेल्या मंडणगड तालुक्यातही आता कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत, ही तालुक्यासाठी चिंताजनक गोष्ट आहे. अशावेळी प्रशासनाचा लोकांवर अंकुश नसल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या सुरुवातीला रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी जसे प्रयत्न झाले, त्याच्या तुलनेत दहा टक्के प्रयत्नही आता दुसरी लाट येत असताना केले जात नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
गतवर्षी सुरुवातीलाच संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी रुग्ण संख्या मंडणगड तालुक्यात सापडली होती. त्यामुळे संपूर्ण जिल्हा अलर्ट झाला होता. त्यावेळी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व शासकीय सक्ती यामुळे गेल्या वर्षभरात मंडणगड तालुक्यात सर्वांत कमी, तर अनेक महिने तालुका कोरोनामुक्त होता. तालुक्यातील जनतेला कोरोनामुक्त ठेवण्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेचा मोठा हातभार होता. गतवर्षी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांपेक्षा कडक लाॅकडाऊन, ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले वैद्यकीय कर्मचारी आणि ग्रामकृतीदल यांच्या सतर्कतेमुळे गावात येणाऱ्या प्रत्येकाची माहिती प्रशासनाकडे मिळत होती आणि त्यावर उपाययोजना होत होत्या. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे कुठेही दिसून येत नाही.
होळी सणासाठी आलेले चाकरमानी असोत वा अन्य कोणीही तालुक्यात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग अगर सॅनिटायझर यांचा विसर पडल्यासारखेच वावरत आहेत. विशेष म्हणजे सणानिमित्त वाहतूक कोंडी होत असताना आणि गर्दी वाढलेली असताना एकही पोलीस कर्मचारी शहरातील मुख्य चाैकात दिसत नाही किंवा या संदर्भात नगरपंचायतीकडूनही कोणतीच उपाययोजना होताना दिसत नाही. नुकतेच मंडणगड शहरात होळी सणासाठी आलेले दोनजण कोरोनाबाधित आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर मंडणगड नगरपंचायतीने केवळ इमारत सॅनिटायझर करण्यापलीकडे काहीच केले नाही. विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या माध्यमातून कोणतीही उपाययोजना न होणे हे चिंताजनक आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून मंडणगड नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाचे माध्यमातून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पाहत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनपासून मंडणगड नगरपंचायतीने तत्कालीन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या नियोजनाखाली शहरात विविध उपाययोजना केल्या होत्या. त्या जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरल्या. त्यामुळे मंडणगड शहर कोरोनापासून संरक्षित राहिले होते. नगरपंचायत आपले कार्यक्षेत्र सोडून लगतच्या गावांमध्येही जाऊन संपूर्ण गाव सॅनिटाझेशन करून देत होते. मात्र, नोव्हेंबर महिन्यात मंडणगड नगरपंचायतीवरील लोकप्रतिनिधींचा कार्यकाल संपला व कारभार प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून चालविला जात आहे. तेव्हापासून अशा कोणत्याच उपाययोजना झालेल्या नाहीत.
मंडणगड शहरात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी आरोग्य विभाग आग्रही असला तरी नगरपंचायत पुढे येत नसल्याने शहरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात अडचणी येत आहेत. सॅनिटायझेशनकरिता नगरपंचायतीने युद्धपातळीवर लाखो रुपये खर्च करून उभी केलेली यंत्रसामग्री सध्या धूळ खात पडली आहे. शहरात कोरोना रुग्ण सापडूनही नगरपंचायतीने कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. आरोग्य विभाग, तर नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचीच परिस्थिती आहे. शिमगोत्सवाच्या धामधुमीत शहरात वाढलेली गर्दी लक्षात घेऊन नगरपंचायत नव्याने कामास लागणार का, असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.