चिपळूण : तालुक्यातील मांडकीनंतर मार्गताम्हाने बुद्रुक येथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या गावात ८१ कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली आहे.
तालुक्यात सद्य:स्थितीला मार्गताम्हाणे बुद्रुक, दळवटणे, तनाळी आदी गावांत बाधित रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. तिथे आरोग्य विभाग, तालुका प्रशासन आणि ग्राम कृतीदलाकडून मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे.
मार्गताम्हाणे येथे घाणेकरवाडी आणि बाजारपेठ परिसरात कोरोनाचा जास्त संसर्ग झाला आहे. त्याचा प्रसार आणखी होऊ नये यासाठी ग्रामपंचायत तसेच ग्राम कृती दलाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोना चाचणीवर अधिक भर देत बाधित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले. आता ८१ रुग्णांपैकी दहाजण बरे झाले आहेत. गावातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येईपर्यंत सर्व ग्रामस्थांनी नियमावली पाळण्याचे आवाहन ग्राम कृतीदलाकडून करण्यात आले आहे. रुग्णांच्या विलगीकरणासाठी माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या संस्थेच्या इंग्लिश मिडीयम शाळेत विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे ४० बेडची व्यवस्था आहे. या विलगीकरण केंद्रासाठी दानशूर ग्रामस्थांनी सढळ हस्ते मदत दिली.
याविषयी सरपंच प्रभाकर चव्हाण यांनी सांगितले की, गावातील कोरोनाचा संसर्ग आता नियंत्रणात आहे. त्यासाठी ग्राम कृतीदलाचे सदस्य तसेच ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळत आहे. सर्वांच्या प्रयत्नातून गाव कोरोनामुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. सध्या असलेल्या बाधित रुग्णांचीही काळजी घेतली जात आहे. लोकही काटेकोर नियम पाळू लागले आहेत. विलगीकरण केंद्रात आवश्यक असलेल्या उपाययोजना लोकसहभाग आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पूर्ण केल्या आहेत. ग्रामसेवक मनोहर गायकवाड, आशा, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका, रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मेहनत घेत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात गाव कोरोनामुक्त होईल. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.