शोभना कांबळेरत्नागिरी : पूर्वी शासकीय सेवेसाठी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य असायचे. पण आता उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ना, याची शहानिशा करण्यासाठी खासगी आस्थापना तसेच विविध परवान्यांसाठीही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागितले जात आहे.यापूर्वी शासनाच्या सेवेत रूजू होण्यासाठी पोलीस विभागाकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. मात्र, बदलत्या काळानुसार गुन्हेगारीत वाढ होऊ लागल्याने आता शासकीयबरोबरच खासगी आस्थापनांमध्येही उमेदवाराचे चारित्र्य पाहिले जाते. त्यामागे गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये, यासाठी उमेदवाराला पडताळणी प्रमाणपत्र दाखल करावे लागते.
गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीसाठीही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. तसेच शासकीय समितीवर निवड, विविध शासकीय परवाने, बँकांमध्ये नोकरी, विविध उद्योग, कारखाने, खासगी आस्थापना, सुरक्षारक्षकांची भरती आदींसाठी पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते.गेल्यावर्षी १०,२८३ ऑनलाईन आणि ३३० ऑफलाईन अशी एकूण १०,६१३ प्रमाणपत्र पोलीस विभागाकडून देण्यात आली होती. मात्र, यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने एप्रिल ते जुलै या कालावधीत पडताळणीची संख्या कमी आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा पडताळणीसाठीचे प्रस्ताव वाढू लागले असून, ३ डिसेंबरपर्यंत ही संख्या ६,८१४ झाली आहे.दोन वर्षांत १७,४२७ कर्मचाऱ्यांची पडताळणीगेल्यावर्षी १०,६१३ विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी पोलीस विभागाकडून करण्यात आली होती. यावर्षी कोरोनामुळे एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत कमी प्रस्ताव दाखल झाले. मात्र, तरीही जून ते ३ डिसेंबर २०२० या कालावधीत ६,८१४ प्रमाणपत्रे देण्यात आली.पडताळणीसाठी असा करा अर्जपडताळणी जलदगतीने होण्यासाठी २०१७ सालापासून ऑनलाईन प्रणाली सुरू झाली आहे. त्यासाठी pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. त्यासोबत आधार, पॅनकार्ड आदी कागदपत्रे जोडावी लागतात.
कुठेही काम करताना उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही ना, हे पाहिले जाते. आता तर कुठल्याही ठिकाणी त्याच्याकडून गुन्हा घडला असेल, तर महाराष्ट्रात कुठेही चारित्र्य पडताळणीसाठी अर्ज केला तरी त्यावर त्याने केलेला गुन्हा नमूद होतो.- हेमंतकुुमार शहा,पोलीस अधिकारी
उद्योग किंवा कारखान्याची विश्वासार्हता महत्त्वाची असते. त्यामुळे त्यात काम करणारे कर्मचारी हेही विश्वासू असावे लागतात. याठिकाणी काम करणाऱ्या कामगाराला जर कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, तर ती त्या उद्योगासाठी घातक असते. त्यासाठी त्याला कामावर घेतानाच त्या उमेदवाराची चारित्र्य पडताळणी करणे गरजेचे असते.- अभिजीत जाधव, उद्योजक