मंडणगड : वेळास येथील यंदाच्या कासव महोत्सवावर आता कोरोना आजाराचे संकट उभे ठाकले आहे. जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोनाचे रूग्ण मुंबई व पुणे या दोन महानगरात सापडल्याने वेळास येथील कासव महोत्सव यावर्षीकरिता रद्द करण्यात आल्याची माहिती सरपंच तोडणकर यांनी दिली आहे.यासंदर्भात जनजागृती करून खबरदारीचे उपाय योजण्याकरिता १२ मार्च २०२० रोजी ग्रामसभेचे आयोजनही करण्यात आले होते. कोरोना व्हायरसच्या दक्षतेकरिता यावर्षीचा कासव महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरपंच तोडणकर यांनी सांगितले. यंदाच्या कासव विणीच्या हंगाम १९ घरट्यात २१३० कासवाची अंडी, तर एक घरटे नैसर्गिक पध्दतीने संरक्षित करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या हंगामात अधिक पिल्ले बाहेर पडण्याची शक्यता होती. घरटी संरक्षित करण्याचा काळ व विणीचा हंगाम याचे गणित मांडून आयोजक व वन विभागाने ३ मार्च ही तारीख काढली व ३ मार्चपासून कासव महोत्सव सुरु होणार असल्याची जाहिरात विविध माध्यमातून करण्यात आली. मात्र, आयोजकांच्या अंदाजाच्या चार दिवस आधीच कासवांची पिल्ले सुमद्राकडे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.यावर्षी आयोजकांचा अंदाज फसला व आयोजकांना ठरवून दिलेल्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक जमनूही पिल्ले बाहेर न पडल्याने पर्यटकांची निराशा झाली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोरोनाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय दळणवळणावर परिणाम झाला आहे. मुंबई, पुणे ही दोन शहरे आरोग्याच्या दृष्टीने सध्या हाय अर्लटवर असल्याने कोरोनाचा परिणाम ग्रामीण भागावरही होऊ लागला आहे. वेळास कासव महोत्सवाला पुण्यातील पर्यटकांचा ओघ मोठा असतो. सध्याची स्थिती आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास पर्यटक पाठ फिरवण्याची भीती अधिक आहे.महोत्सव रद्द, मात्र पिल्ले समुद्रात सोडणारयंदाच्या हंगामात यापुढील काळात कासव महोत्सव होणार नाही. वेळास येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेनंतर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रल्हाद तोडणकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. आरोग्य सुरक्षेच्या कारणास्तव १२ मार्च २०२० नंतरचे या वर्षीचे पूर्ण हंगामात महोत्सवाचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. मात्र, पिल्ले समुद्रात सोडण्याची प्रक्रिया हंगाम संपेपर्यंत नियमित सुरु राहणार आहे.
वेळास कासव महोत्सवावर कोरोनाचे सावट ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:31 PM
मुंबई, पुणे ही दोन शहरे आरोग्याच्या दृष्टीने सध्या हाय अर्लटवर असल्याने कोरोनाचा परिणाम ग्रामीण भागावरही होऊ लागला आहे. वेळास कासव महोत्सवाला पुण्यातील पर्यटकांचा ओघ मोठा असतो. सध्याची स्थिती आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास पर्यटक पाठ फिरवण्याची भीती अधिक आहे.
ठळक मुद्देयावर्षी आयोजकांचा अंदाज फसला व आयोजकांना ठरवून दिलेल्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक जमनूही पिल्ले बाहेर न पडल्याने पर्यटकांची निराशा झाली.