गणपतीपुळे : कोरोना विषाणूचा पर्यटनाला फटका बसला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटक व भाविकांची संख्याही यामुळे रोडावली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात आहे.याठिकाणी मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापन समितीने बैठक घेऊन कोरोनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देवस्थानचे सरपंच डॉ. विवेक भिडे यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, मंदिर बंद करण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. तसेच त्याबाबत आपल्याला राज्य शासनाकडूनही कुठल्याही प्रकारचे निर्देश आलेले नाहीत.मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझरची सोय उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच देवस्थानमधील कर्मचाऱ्यांनाही मास्क लावूनच पर्यटकांच्या सेवेसाठी कार्यरत ठेवण्यात येणार आहे.
कोरोनामुळे खासगी हॉटेल्स व लॉजिंगमधून पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. तर गणपतीपुळे येथील एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये पर्यटकांनी केलेली आरक्षणे रद्द केली आहेत. पर्यटकांची संख्या रोडावल्याने पर्यटन महामंडळाला फटका बसला आहे.मंदिर बंदची अफवागणपतीपुळे परिसरात कोरोनाच्या भीतीने पर्यटन व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले स्वयंभू गणेश मंदिर भाविक - पर्यटकांसाठी बंद होणार, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. परंतु, याबाबत मंदिर व्यवस्थापन समितीकडून तातडीची बैठक घेण्यात येऊन मंदिर बंद ठेवणार नसल्याचे जाहीर केले. मंदिर बंद होण्याबाबतची ती अफवा असल्याचे सांगण्यात आले आहे.