रत्नागिरी : गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यावर कोरोनाचे सावट आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे येत्या दोन दिवसांत लॉकडाऊन घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवार, दि. १४ एप्रिलपासून एक महिन्याच्या उपवासांना (रोजे) प्रारंभ होणार आहे. अन्य सण-उत्सवांप्रमाणेच रमजानसाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
भाविकांनी धार्मिकस्थळी अथवा रस्त्यावर गर्दी न करता घरातच सण साजरा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मुस्लिम धर्मात हा महिना पवित्र मानला जातो. यामध्ये महिनाभर उपवासासोबत विविध धार्मिक कार्यक्रम असतात. मात्र, यावर्षीर्ही ते गर्दी टाळून करण्याच्या सूचना सरकारतर्फे करण्यात आल्या आहेत. रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. शिवाय मुस्लिम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येत असतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.
मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणासाठी एकत्र न जमता, आपापल्या घरातच दुवा पठण करावे.
‘शब-ए-कद्र’ ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. यानिमित्ताने मुस्लिम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. मात्र यावर्षी सर्व मुस्लिम बांधवांनी संबंधित धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत. कोणत्याहीप्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे.