रत्नागिरी : जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालांमध्ये आणखीन ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १८३ इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे पाचजणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबईकरांचाच समावेश आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.मंगळवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीतील ३, संगमेश्वरातील ३ आणि लांजा व राजापूरमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. रत्नागिरीत आढळलेल्या रुग्णांमध्ये नाणीज - घडशीवाडी येथील ४८ वर्षाच्या युवकाचा समावेश आहे. ते २३ मे रोजी मालाड येथून आले होते. ताप आणि अंगदुखी जाणवू लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तसेच त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रत्नागिरी शहरानजीकच्या शांतीनगर येथील १८ वर्षाच्या तरुणाला संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.संगमेश्वर तालुक्यातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, मानसकोंड - फेपडेवाडीत विरारहून आलेल्या पती - पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मुलुंड येथून दख्खन येथे आलेल्या ४८ वर्षाच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते १९ मे रोजी गावी आले होते.त्याचबरोबर लांजातील पुनस येथील कुंभारवाडी येथे २१ मे रोजी चेंबूर येथून आलेल्या ४८ वर्षाच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच राजापूर येथे कांदिवलीतून आलेल्या १४ वर्षाच्या तरुणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तिचे आई, वडील आणि भाऊ यांचेदेखील अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्वांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.