रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी रात्री उशिराने दापोलीतील तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांचा आकडा ४३ वर पोहोचला आहे. रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील ४ तर संगमेश्वरातील ४ जणांचा समावेश आहे. रत्नागिरीत आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीचाही समावेश आहे.
जिल्ह्यात आठवडाभराच्या कालावधीत ३७ कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून, त्यातील ३६ जण मुंबईकर आहेत़ शनिवारी मंडणगड तालुक्यातील ११ आणि खेडमधील २ असे एकूण १३ रुग्ण सापडले होते. त्यानंतर रात्री उशिरा दापोली तालुक्यातील दर्दे येथील ३५ वर्षीय तरुण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले़ हा तरुण मुंबईतील जोगेश्वरी येथून ७ मे रोजी दापोलीत गावी जाण्यासाठी आला होता़ त्याला प्रशासनाने दापोली येथील डॉ़ बाळासाहे सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या किसान भवनात विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन केले होते़रविवारी सायंकाळी रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.
रत्नागिरीत आढळलेल्या रुग्णांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नर्सिंग विद्यार्थिनीचा समावेश आहे. कोरोनाबाधित होणारी ती दुसरी नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. तर १ कर्ला, १ सोमेश्वरमधील आहेत. मात्र, एकजण नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. रत्नागिरीत आढळलेल्या नवीन ४ रुग्णांमुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या एकूण ९ झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यात आढळलेल्या चार रुग्णांमध्ये कळंबुशीतील एकजण असून, तो ५ मे रोजी मुंबईवरुन गावी आला होता. पीर धामापूरमधील दोघे ६ मे रोजी तर फुणगूसमधील एकजण ७ मे रोजी गावी आला होता. या सर्वांना साडवली येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. विलगीकरण कक्षातील रुग्णांना कोरोनाची बाधा होताच रविवारी सायंकाळी संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोनाबाधित चौघांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.