रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिर्डीसारख्या मोठ्या मंदिरांपाठोपाठ आता गर्दी होणाऱ्या सर्व धर्माच्या प्रार्थनास्थळांची, संप्रदायांच्या बैठकांची माहिती संकलन करण्याचे आदेश महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ही सर्व ठिकाणेही सरकार बंद करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्री उशिराने याबाबतचा आदेश महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, सकाळी ११ वाजेपर्यंत अद्ययावत याद्या सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिर्डीसह राज्यातील अनेक मोठी मंदिरे आजपासून भाविकांना बंद करण्यात आली आहेत. गणपतीपुळे येथील मंदिराचाही त्यात समावेश आहे. आता दुसऱ्या टप्प्यात सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे, विविध संप्रदायांच्या बैठका अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करण्याचे आदेश महसूल खात्याला देण्यात आले आहे. रात्री उशिराने हे आदेश महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या व्हॉटसॲपवर पाठवले जात होते. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ही यादी मागवण्यात आली आहे. कोरोना प्रसाराचा वेग लक्षात घेऊन गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचे यातून दिसत आहे.