रत्नागिरी : राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तोच आरोग्य सुविधेवर जास्तीत जास्त खर्च करण्याचे आदेशही दिले आहेत. रत्नागिरीतील कोरोना तपासणी लॅबबाबत खलिला वस्ता यांच्यातर्फे अॅड. राकेश भाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी अंतिम निर्णय देण्यात आला.महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून कोरोना तपासणीसाठी मिरज किंवा कोल्हापूर येथे नमुने पाठविण्यात येत होते. मात्र, ते मिळण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याने अॅड. राकेश भाटकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात लॅब सुरू करण्याबाबत याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ए सय्यद यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. त्यावर शुक्रवारी निर्णय देण्यात आला.या याचिकेवरील पहिल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्यातील इतर जिल्ह्यांची माहिती मागविली होती. राज्य सरकारने दिलेल्या या माहितीनुसार राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये तपासणी लॅब नसल्याचे पुढे आले होते. आयसीएमआर यांच्या नियमानुसार ज्या जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळलेले आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये कोरोना तपासणी लॅब असणे गरजेचे आहे, असे स्पष्ट केले आहेत.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजना पाहता मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब त्वरीत सुरू करा, आयसीएमआरच्या गाईडलाईन्स नुसार प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब असली पाहिजे, असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.