रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात बहुचर्चित कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे (आरटी पीसीआर) उद्घाटन ९ जून रोजी सकाळी १२.३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर जिल्हा शल्य चिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांचाच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना विसर पडल्याचे दिसून आले.कोरोनाच्या तपासणीसाठी स्वँबचे नमुने सध्या मिरज आणि कोल्हापूर येथे पाठविण्यात येत आहेत. मात्र, आता स्वॅबची संख्या वाढू लागल्याने मिरज येथून नकार देण्यात आला आहे. तसेच रूग्णसंख्येबरोबरच संशयितांच्या संख्येत वाढ होत असल्याने अहवाल उशिरा येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोना रूग्णावर तातडीने उपचार होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरू करण्याची मागणी जोरदार होत होती.
अखेर जिल्हा प्रशासनाकडून यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. यासाठी मंत्री उदय सामंत यांनीही पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री निधीतून १ कोटी ७ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला.या निधीतून ही प्रयोगशाळा मंगळवारपासून सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावासह पालकमंत्री अनिल परब, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री उदय सामंत यांच्यासह सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, प्रधान सचिव यांचीही नावे टाकण्यात आली आहेत.मात्र, या कोरोनाच्या काळात जबाबदारीने आणि दिवस रात्र काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या साध्या नावाचाही उल्लेख केला नसल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या काळात काम करणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांच्या नावाचा उल्लेख डावलण्यात आला आहे. ज्या आरोग्य विभागासाठी ही लॅब सुरू करण्यात येत आहे. त्याच आरोग्य विभागाच्या जिल्हा शल्य चिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं