रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी कोरोनाबाधितांचा आकडा १६१ वर पोहोचला असतानाच मंगळवारी सकाळी १० वाजता कोरोनाबाधित पाचव्या रुग्णाचा मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील प्रौढाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संगमेश्वर तालुक्यातील कोरोनाचा हा पहिलाच बळी ठरला आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आत्तापर्यंत १६१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबईकरांचाच समावेश आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत तब्बल ७४ हजार नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १६१ झाली असून, ५५ जण बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत. मात्र, मंगळवारी सकाळी संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील एका प्रौढाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.
माळवाशी येथील मृत्यूमुखी पडलेली व्यक्ती मुंबईतून आलेली असून, १९ मे रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेले आठ दिवस कोरोनाशी झुंज देत असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.जिल्ह्यात आत्तापर्यंत खेड तालुक्यातील अलसुरेतील व्यक्ती, दापोली तालुक्यातील माटवण येथील महिला, गुहागर तालुक्यातील जामसूद येथील महिला आणि रत्नागिरी तालुक्यातील नाचणे - शांतीनगर येथील महिलेचा मृत्यू झाला आहे.