रत्नागिरी - सेवानिवृत्तीनंतरही पुन्हा सेवेत कार्यरत राहून रुग्ण सेवा देणारे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे (६५) यांचा गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या दरम्याने कोरोनाने मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्यांनी ४२ बालकांना कोरोनामुक्त केले होते. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
डॉ. मोरे रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ म्हणून दाखल झाले होते. वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत जिल्हा रुग्णालयात त्यांनी बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा केली. कुवारबाव येथे स्वतःच्या घरीही ते रुग्णांना सेवा देत असत. निवृत्तीनंतर लांजा येथे काही काळ त्यांनी दवाखाना सुरू केला होता. नंतर ते पुन्हा जिल्हा रुग्णालयात मानद बालरोगतज्ज्ञ म्हणून रुजू झाले. त्यानंतर सुमारे सहा वर्षे ते तेथे कार्यरत होते.
गेल्या मार्च महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात सहा महिन्यांच्या एका बालकाला काेरोनाची बाधा झाली. त्याची आई काेरोनामुक्त होती. पण तिच्या बालकाला कोरोना झाल्यामुळे त्याच्यावर उपचार करणे अत्यंत आव्हानाचे होते. ते आव्हान डॉ. मोरे यांनी लिलया पेलले. मातेच्या दुधावरच त्या बालकाला बरे करण्यात त्यांनी यश मिळवले. त्यानंतर तीन महिन्यांत सुमारे ४२ बालकांना त्यांनी कोरोनामुक्त केले.
जुलै महिन्यात त्यांनी जिल्हा रुग्णालयातील मानद सेवा थांबविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्याचदरम्यान त्यांना स्वतःला काेरोनाची बाधा झाली. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. मात्र, बुधवारी दिवसभरात त्यांची प्रकृती ढासळली आणि गुरुवारी पहाटे त्यांचे निधन झाले. कोरोनाच्या दाढेतून ४२ बालकांना सुखरूप बाहेर काढणारा कोरोनाचा योद्धा गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
Breaking: रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट जैसे थे; आरबीआयकडून EMI सवलतीवर सस्पेन्स कायम
CoronaVirus News : काय सांगता? रेनकोट समजून चोरलं पीपीई किट अन् झालं असं काही...
बापरे! कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा धोका; 7 लोकांचा मृत्यू, 60 जणांना लागण
CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! जगभरात दर 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू