रत्नागिरी - हवेतला ऑक्सिजन काॅम्प्रेस करुन तो सिलिंडरद्वारे गंभीर रुग्णांसाठी वापरण्याची यंत्रणा जिल्हा शासकीय रुग्णालयात उभारण्यात आली असून, दोन दिवसांच्या चाचणीनंतर आता हा ऑक्सिजन नियमित रुग्णांसाठी वापरण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आतापर्यंत तब्बल २३,६२६ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर उपचारासाठी उशिरा येत असल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. गंभीर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे असल्याने जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी रुपयांच्या निधीतून जिल्हा शासकीय रुग्णालयात हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन बेडची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करता येणार आहे.हवेतील ऑक्सिजन काॅम्प्रेसरच्या सहाय्याने शोषून घेत तो सिलिंडरमध्ये फिल्टर करून सोडला जातो, अशी या प्रकल्पाची कार्यप्रणाली आहे.
प्रारंभी दोन दिवस या प्लांटमधून तयार होणाऱ्या ऑक्सिजनची चाचपणी करण्यात आली. हवेतून थेट शोषल्या जाणाऱ्या मात्र, त्याचे शुद्धीकरण करून वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनपासून रुग्णांना काही त्रास होईल का, याची दोन दिवस कसोशीने पाहणी करण्यात आली. त्यातून सकारात्मक निष्कर्ष निघाल्यानंतरच आता हा ऑक्सिजन नियमित रुग्णांसाठी वापरण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या हवेतून निर्माण होणाऱ्या या प्लांटमुळे आता अधिक क्षमतेने ऑक्सिजन बेड वाढविता येणार आहेत.
सध्या जिल्हा महिला रुग्णालयातही ऑक्सिजन प्लांंट उभारण्याची प्रक्रिया सुरू असून त्याचबरोबर कळंबणी, कामथे, दापोली उपजिल्हा रुग्णालय आणि आणि घरडा हाॅस्पिटल येथेही ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांनी दिली.
काय असेल क्षमताएका जंबो सिलिंडरची क्षमता ७.१ घनमीटर इतकी असते. या कार्यप्रणालीच्या आधारे अशा पद्धतीचे सुमारे ४० ते ४४ जंबो सिलिंडर इतका ऑक्सिजन या प्लांटमधून उपलब्ध होत आहे.जिल्ह्यात आणखी पाच प्लांटमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तालुकास्तरावर ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यानुसार जिल्ह्यात पाली, रायपाटण, संगमेश्वर, लांजा आणि मंडणगड येथे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.