रत्नागिरी : राजीवडा येथे कोरोना रुग्ण असताना आणि जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी लागू केलेली असताना जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलणाऱ्या राजीवडा येथील 200 जणांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये जियाउद्दीन फंसोपकर, फैजान फंसोपकर, सलमान पकाली, राहील फंसोपकर, मुज्जफर मुजावर, अरमान मुजावर, शमशुद वस्ता, नबील, अकिल, गुड्डू कोतवडेकर, जूबेड वस्ता, रिज्जू पकाली, हसनमियाँ, चर्सी बादशाह, खालिद, आपान मलबारीचा मुलगा, रियाज फँसोपकर या अठरा जणांसह आणखी 150 ते 200 अनोळखी असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजीवडा येथे एक कोरोना संसर्ग बाधित रुग्ण सापडला आहे. कोरोना पसरण्याची भीती असतानाही आरोपींनी बेकायदेशीर जमाव केला. राजीवडा, खडपेवठार बाजूकडील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर जमाव जमवून बेकायदेशीर कृत्य केलं. जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लघंन केले. तसेच फिर्यादी पोलीस शासकीय कर्तव्य पार पाडीत असताना हा जमाव त्यांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांकडील मोबाईल व लाठी हिसकावण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. फिर्यादी यांच्या डोक्यात मारून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली निजामुद्दिन मरकजमध्ये सहभागी झालेला रत्नागिरी राजीवडा येथील एक प्रौढ कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. शुक्रवारी त्याचा अहवाल आल्यावर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने तातडीने हालचाली सुरू करून १८ जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी आरोग्य खात्यातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार होते. मात्र मोहल्ल्यातील लोकांनी त्यांना पिटाळून लावले. ही बाब समजताच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी कडक कारवाईचा निर्णय घेतला. डॉ. मुंढे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ध्वनीक्षेपकावरुन लोकांना सर्वेक्षणासाठी आवाहन केले. या कामात आडथळा आणणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.