लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर आठवडाभराच्या कालावधीतच शनिवारी दोन मुंबईकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर रविवारी आणखी दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. मंडणगड तालुक्यातील तिडे आणि संगमेश्वर तालुक्यातील पूर येथे मुंबईतून आलेले दोघेजण कोरोनाबाधित आढळले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १० वर पोहोचली असून, जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे. मंडणगडमधील तिडे आणि संगमेश्वरातील पूर गाव तत्काळ सील करण्यात आली आहेत. या दोघांनाही उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात येणार आहे.
जिल्ह्यात केवळ ६ कोरोनाबाधित सापडले होते. त्यापैकी ५ जण बरे झाले असून, एकाचा मृत्यू झाला होता़ कोरोनाबाधित सहावा रुग्ण सापडल्यानंतर सुमारे १५ दिवसांच्या कालावधीत एकही नवा रुग्ण जिल्ह्यात सापडला नव्हता़ मात्र, शनिवारी चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली आणि संगमेश्वरातील बामणोली येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयाने जिल्हाभरातून स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठविले होते़ त्यातील ८५ नमुन्यांचा अहवाल रविवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला़ ते सर्वच अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला होता. मात्र, रविवारी रात्री मंडणगड आणि संगमेश्वर तालुक्यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच प्रशासनाची झोप उडाली आहे. मंडणगड तालुक्यातील तिडे येथील व्यक्ती २९ एप्रिल रोजी मुंबईतून आडवाटेने चालत गावी आली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी माहिती देताच त्याला क्वॉरंटाईन करण्यात आले होते. या ग्रामस्थासह अन्य २० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे अहवाल रविवारी रात्री प्राप्त झाल्यानंतर मुंबईतून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले.
त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील एका महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला शनिवारी मुंबईतून पास घेऊन खासगी वाहनाने पूर - झेपलेवाडी येथे आली होती. ती मुंबईतून आल्यानंतर तिचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी रात्री प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आहे. या महिलेला तत्काळ क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.