चिपळूण : शहरातील नगर परिषद इमारतीच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. या कामामध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते राजेश देवळेकर यांनी केला आहे. यासंदर्भात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, अद्याप हा चौकशी अहवाल गुलदस्त्यात असल्याबद्दल नागरिकांतून उलटसुलट चर्चा करण्यात येत आहे. नगरपरिषद इमारत जुनी असल्याने या इमारतीच्या वरील मजल्याचे काम करण्यासाठी स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. इमारतीचा काही भाग धोकादायक असल्याने त्याची दुरुस्ती करण्याचा प्रस्तावही सभेत ठेवण्यात आला होता. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी या इमारतीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. यासाठी लाखो रुपये खर्चासही सभेत मंजुरी देण्यात आली होती. निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करुन इमारत दुरुस्तीचे काम घाईगडबडीत करण्यात आले. मात्र, हे काम आवश्यक त्या पद्धतीने झालेले नाही. तसेच या कामात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेते राजेश देवळेकर यांनी करुन गौप्यस्फोट केला. इमारत दुरुस्तीच्या कामाचे बिलही संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते देवळेकर यांनी मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. तत्कालिन बांधकाम अभियंता आत्माराम जाधव, भालचंद्र क्षीरसागर आदींसह बांधकाम विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी पुन्हा या कामाचे मोजमाप केले. त्याचा अहवाल मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे सादर केला. प्रथमदर्शनी कामामध्ये तफावत असल्याचेही निदर्शनास आले होते. संबंधित ठेकेदाराकडून बिल अदा करण्यात येईल, असे निर्देशही नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आले. परंतु, आजतागायत हे काम योग्य आहे अथवा कसे ? संबंधित ठेकेदारावर कोणती कारवाई झाली, याबाबतचा अहवाल गुलदस्त्यात असून, याबाबत खरोखरच गैरव्यवहार झाला अथवा नाही, हेदेखील प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले नसल्याने नागरिकांतून उलटसुलट चर्चा सुरु आहे. या प्रकरणाकडे साऱ्या शहरवासीयांचे लक्ष लागले वेधले गेले आहे. (वार्ताहर)गटनेत्याचा गौप्यस्फोट ....इमारत दुरुस्तीच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप; शिवसेनेचे गटनेते राजेश देवळेकर यांनी केला होतासंबंधितांना नोटीस पाठवून प्रशासनाकडून कार्यवाही नाही नगर परिषद इमारतीला गळती लागल्याने दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नगरपरिषद इमारत दुरूस्तीतच भ्रष्टाचार होत असेल तर अन्य कामांचे काय असा प्रश्न विचारला जातोयआरोपाने खळबळ
दुरूस्तीत गैरव्यवहार...
By admin | Published: September 14, 2014 9:49 PM