राजापूर : राजापूर नगरपरिषदेतील सत्ताधारी काँग्रेसने ठेकेदारीतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून, योग्यवेळी सर्व प्रकरणे बाहेर काढली जातील व भ्रष्ट राजवट उलथवून विकासाला प्राधान्य देणारी शिवसेना राजापूर नगरपरिषदेवर भगवा फडकवेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी राजापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. नजीकच्या काळात होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी राजापुरातील इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.राजापूर नगर परिषदेत काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी ठेकेदारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्या पालकमंत्र्यांनी नगरोत्थानमधून दिलेल्या निधीतही येथील भ्रष्ट सत्ताधाऱ्यांनी अपहार केल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. येथील भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना जनता कंटाळली असून, पुढील निवडणुकीत त्यांना सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमच्याकडे नगराध्यक्षांसह सर्व आरक्षणातील सक्षम उमेदवार आहेत. इच्छुकांची संख्या जास्त असली तरी पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याला निवडून आणून नगरपरिषदेवर भगवा फडकवण्यासाठी सर्वजण कटिबध्द आहेत, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आमच्या सर्व शिवसैनिकांत जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झाला असून, ही भ्रष्ट राजवट उलथवून सेनेची सत्ता आणण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे ते म्हणाले.केंद्र व राज्यात युती असल्याने नगरपरिषद निवडणुकीत युती होणार का? असे विचारले असता या दोन्ही जिल्ह्यात भाजपच्या अनेक कार्यकर्त्याना सेनेशी युती हवी आहे, तथापी भाजपच्या अहंकारी जिल्हा नेतृत्त्वामुळे युतीला अडथळे निर्माण झाले आहेत, असे सांगून त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यावर जोरदार तोफ डागली, ते पक्षापेक्षा स्वत:ला मोठे समजत आहेत. मात्र, वरिष्ठ पातळीवरून युतीबाबत विचारणा झाल्यास विचार करू, असे सकारात्मक उत्तर त्यांनी दिले. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी आमदार गणपत कदम, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, तालुकासंपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, शहरप्रमुख अनिल कुडाळी, नगरपरिषद विरोधी पक्ष गटनेते अभय मेळेकर, महिला बालकल्याण सभापती दुर्वा तावडे आदींसह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)निवडणुकीची रणधुमाळी : आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीराजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी उडू लागली आहे. खासदार विनायक राऊत यांनी राजापूर येथे इच्छुक उमेदवारांशी चर्चा साधली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस आणि भाजपवर शरसंधान साधले. राजकीय आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी आतापासून झडू लागल्याने निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.
काँग्रेसचा ठेकेदारीतून भ्रष्टाचार
By admin | Published: August 26, 2016 12:42 AM