रत्नागिरी : मागच्या वर्षी शिवभोजन थाळीच्या नावाने रत्नागिरी जिल्ह्याला १ कोटी ३२ लाख रुपये मिळाले. ही रक्कम जिल्ह्यातील शिवसेनेच्या आणि चिपळूण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्याची यादी आपल्याकडे आहे. शिवभोजन थाळीची जिल्ह्यात २२ केंद्रे आहेत. त्यापैकी ८ केंद्रे रत्नागिरी शहरात आहेत. रत्नागिरीतील केंद्रांवर दररोज ११०० ते १२०० लोक जेवतात का, असा प्रश्न उपस्थित करून भाजप नेते व माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवभोजन थाळीमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे शहराध्यक्ष तसेच विभागप्रमुख व पदाधिकारी शिवभोजन थाळ्या चालवीत आहेत. थाळीच्या नावावर मिसळ देत असल्याच्या अनेक ठिकाणच्या तक्रारी आहेत, तर थाळी वाटप न करता अनेक ठिकाणी केवळ नावे पाठविली जात आहेत. कारण अधिकारी यांच्यावर दबाव आणला जात असून, जी नावे दिली जातील ती घेतली जात आहेत. प्रत्येक महिन्याला शिवभोजन थाळीच्या नावाखाली लाखो रुपये थाळी चालविणाऱ्यांना मिळत आहेत. तेच पैसे आरोग्य सेवेसाठी वापरावेत, असेही राणे यांनी सांगितले.
शिवभोजन थाळीचा हेतू चांगला आहे. मात्र, त्याच्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असून, त्यामध्ये शिवसेनेचे, तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. हे पैसे रत्नागिरी जिल्ह्याच्या आरोग्यासाठी वाटप करण्यात आले असते तर किती जीव वाचले असते, असेही राणे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, राजेश सावंत, सचिन वहाळकर व अन्य उपस्थित होते.