खेड : चक्रीवादळामुळे केवळ घरांचे आणि झाडांचे नुकसान झाले आहे, असे वाटत असतानाच, तालुक्यातील बोरज घोसाळकर वाडीनजीक येथे दांपत्याचा बळी गेला. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्यासुमारास वादळामुळे तुटलेल्या ३३ केव्हीच्या विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रकाश गोपाळराव घोसाळकर व वंदना प्रकाश घोसाळकर (रा. घोसाळकरवाडी, बोरज) अशी त्यांची नावे आहेत.
सोमवारी सायंकाळी ते आपल्या दुचाकीवरून (एमएच ०८ ए एच ५०८३) घरी परत जात होते. वाडीनजीक ३३ केव्ही क्षमतेची विद्युतवाहिनी असताना, विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून ते जमिनीवर कोसळले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने या घटनेची माहिती महावितरण कार्यालयात दिली व विद्युत पुरवठा खंडित करण्यास सांगितले. त्यामुळे संभाव्य धोका टळला. खेडचे पोलीस उपविभागीय अधिकारी शशी किरण काशीद, सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने भेट दिली.
दोघांचेही मृतदेह विच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. महावितरणचे सहायक अभियंता कौस्तुभ बर्वे, कासार आदींनी कर्मचाऱ्यांसह भेट दिली. यावेळी सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र आंब्रे, प्रभारी सरपंच विशाल घोसाळकर आदींनी घटनास्थळी भेट दिली.