रत्नागिरी : मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असून, या समाजातील नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय कमालीचा दु:खदायी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पुढच्या पिढीवर वाईट परिणाम
मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय अतिशय दु:खदायक असा आहे. हा निर्णय ‘न भूतो न भविष्यति,’ असाच म्हणायला हवा. या निर्णयाचा वाईट परिणाम मराठा समाजातील पुढच्या पिढीवर होणार आहे. आम्ही सध्या काेरोनामुळे थांबलो आहोत. ही परिस्थिती निवळली की मात्र, मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारणार आहोत. कोरोनापेक्षाही हानिकारक असा हा निर्णय आहे.
केशवराव इंदुलकर, कार्याध्यक्ष मराठा मंडळ, रत्नागिरी
दु:खदायी निकाल
न्यायालयाच्या या निर्णयाने अतीव दु:ख झाले आहे. त्यामुळे यावर काय भाष्य करावे, हेच सुचत नाही. त्यामुळे याबाबत प्रतिक्रिया देण्याइतपतही मन:स्थिती नाही, एवढे दु:ख झाले आहे. न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, धक्कादायक असाच आहे.