आबलोली : कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनातर्फे गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात यावेत, असे शासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीतर्फे कोविड विलगीकरण कक्ष स्थापन करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
लोकशिक्षण मंडळ, आबलोलीच्या खोडदे-गोणबरेवाडी येथील शैक्षणिक संकुलात १० बेडचे हे विलगीकरण कक्ष असणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या वर्गखोल्या, वीज, पाणी, स्वच्छता गृह आदी पायाभूत सुविधा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन चंद्रकांत बाईत यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एच. गावड यांनी बेड उपलब्ध करून दिले आहेत. गटविकास अधिकारी अमोल भोसले, सहायक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, विस्तार अधिकारी प्रमोद केळस्कर यांनी भेट देऊन पाहणी केली़. यावेळी लोक शिक्षण मंडळ, आबलोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत, ग्रामसेवक बी. बी. सूर्यवंशी, तलाठी आनंद काजरोळकर, पोलीसपाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य आशिष भोसले, पूजा कारेकर, अमोल पवार, कर्मचारी योगेश भोसले, अमोल शिर्के, प्रकाश बोडेकर, शंकर घाणेकर उपस्थित होते.