देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील नारडुवेनजीक असलेल्या गडनदीमध्ये एका रानगव्याचा चिखलात अडकून मृत्यू झाला. रविवारी नदीकाठाला या रानगव्यांचे दर्शन नागरिकांना झाले हाेते.
मावळंगे गावचे पोलीसपाटील दत्ताराम मोरे यांना याबाबत माहिती देण्यात आली. मोरे यांनी तत्काळ देवरुख वन विभागाशी संपर्क साधून याची माहिती दिली. वन विभागाने घटनास्थळी पाेहाेचून दोरीच्या साहाय्याने गव्याला पाण्याबाहेर काढले. मात्र त्याच्यावर कोणत्याही प्रकारची इजा अथवा जखम नसल्याचे दिसून आले. चिखलाचा व पाण्याचा अंदाज न आल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे पशु अधिकाऱ्यांकडून व टीमकडून सांगण्यात आले. खाडीला भरतीच्यावेळी या नदीला पाणी भरपूर प्रमाणात वाढते. अशावेळी या गव्याला हालचाल न करता आल्यानेच गुदमरून मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़.
यावेळी रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकारी प्रियांका लगड, संगमेश्वर वनपाल ताैफिक मुल्ला, आरवलीचे वनरक्षक आकाश कडूकर, फुणगुसचे आर. डी. पाटील, साखरप्याचे एन. एस. गावडे, नारडुवे माजी सरपंच श्रीधर जोगले, आसवे पोलीसपाटील सुनील पवार उपस्थित हाेते़.