चिपळूण : लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन अनलॉक सुरू झाले असले, तरी पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. शहर आणि ग्रामीण भागात शासनाचे नियम मोडणाऱ्या १० व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये भाजी व्यापारी, गारमेंट, मोबाइल शॉप, चप्पल व्यापारी यांचा समावेश आहे.
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने शासनाने नवीन नियमावली जाहीर करत अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. एकूण ४ टप्पे ठरवून त्यामध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांना उद्योगधंदे सुरू करण्याची मुभा दिली. त्यानुसार सकाळी ९ ते ४ या वेळेत अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या दुकानांना मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार, बाजारपेठा काही प्रमाणात सुरू झाल्या असून, सर्वसामान्य लोकांनादेखील दिलासा मिळाला आहे. परंतु, काही व्यापारी आताही नियमांचा भंग करताना आढळून येत असल्याने पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे.
शासनाचे नियम मोडून कोरोनात थेट आपला व्यापार सुरू ठेवणाऱ्या अशा १० व्यापाऱ्यांवर चिपळूण, सावर्डे आणि शिरगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
त्यामध्ये इरफान अजीज तांबोळी (पोफळी), परवीन कमला राजू (खेर्डी), वैभव किसन भुवड (पाग चिपळूण), सचिन तुकाराम कांबळे (ओझरवाडी), अभिजित अशोक शिर्के (मार्कंडी), इम्तियाज अहमद पालेकर (गोवळकोट), राजन आनंदजी भाटिया (खेंड), मधू संतोष सिंह (सावर्डे), माधुरी महेंद्र मुंडेकर (सावर्डे) यांचा समावेश आहे़ जिल्हाधिकारी यांचे नियम मोडून कोरोना संसर्गास चालना मिळेल, असे वर्तन केल्याप्रकणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.