रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मनरेगाअंतर्गत सन २०२२-२०२३ चा कृती आराखडा तयार करण्यासाठी शिवारफेरी गरजेची आहे. ग्रामसभांनी आपापल्या गावात शिवारफेरी करताना असे वेळापत्रक तयार करण्याची मागणी होत आहे. आपला गाव, आपला विकास या अंतर्गत मनरेगा योजना रत्नागिरी जिल्ह्यात राबविली जात आहे.
नारळ पिकावर चर्चासत्र
रत्नागिरी : तालुक्यातील भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक, खत व्यवस्थापनाविषयी व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आले. कृषिविद्यावेता डाॅ. वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राजेश कांबळे यांनी रिलायन्स फाउंडेशन करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली.
योगीता बांद्रे यांचा सत्कार
दापोली : दापोली पंचायत समितीच्या सभापती योगीता बांद्रे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृह येथे कुणबी समाजोन्नती संघाला वसतिगृह इमारत बांधण्यासाठी ५ कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विजेचा लपंडाव सुरूच
लांजा : तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे घरगुती वापराच्या विद्युत उपकरणांमध्ये सातत्याने बिघाड होऊ लागला आहे. यामुळे वीजग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून, नाहक मनस्ताप होत आहे. विद्युतपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.
नेटवर्क मिळत नाही
चिपळूण : सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्या वार्षिक सभा आता ऑनलाइन होणार आहेत. या सभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन होत असल्या तरी ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्याने सभासदांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. कोविड नियमावलीत ५० सभासदांची उपस्थिती अपेक्षित आहे.
दुतर्फा झाडीमुळे अपघात
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील माखजन-धामापूर-करजुवे रस्त्याची खड्डे पडून दयनीय अवस्था झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालकांना समोरून येणारे वाहन दिसून येण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.