चिपळूण : शहरात सायंकाळी चारनंतर दुकाने बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना त्याचे उल्लंघन करणाऱ्या तालुक्यातील सहा जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तिघे फळविक्रेते आहेत.
कोरोना काळात सकाळी ९ ते ४ या वेळेत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. तरीही काही जण सायंकाळ चारनंतरही आपली दुकाने उघडी ठेवत आहेत. अशांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तीन जुलैला भेंडीनाका येथील अरुण सोपान कुचेकर यांनी सायंकाळी ४ नंतर किराणा स्टोअर्स उघडे ठेवले होते. जुना बसस्थानक परिसरातील नयन शिवाजी पिसे, अनंत गोविंद बांद्रे आणि गांधी चौक येथील जावेद निसार बागवान हे तिघे सांयकाळी चारनंतर फळविक्री करताना आढळले. कोंढेफाटा येथील रघुनाथ रामलिंग जंगम आणि इक्बाल हुसैन नांदगावकर यांचे किराणा मालचे दुकान सायंकाळी चारनंतर उघडे होते. त्यामुळे पोलिसांनी या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.