रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी शहरातील दहा दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ज्या दुकानदारांना मुभा देण्यात आली आहे व अनावश्यक दुकाने उघडली होती अशा दुकानदारांवर गुरुवारी पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
नागरिकांनीसुद्धा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जे नागरिक नियमांचे पालन करणार नाहीत, अशा लोकांवरही पोलीस कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन आहे. अशा पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानधारक शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतात का, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी राम आळी, गोखले नाका याठिकाणी चालत फेरफटका मारला व जी दुकाने अर्धवट शटर उघडून ग्राहकांना दुकानात घेतात, अशा दुकानदारांवर कारवाई केली. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे ही गरज आहे व अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनीही जे नियम आहेत त्यांचे पालन करावे, असे आवाहनसुद्धा डाॅ. गर्ग यांनी केले.