संदीप बांद्रे
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : शहरातील स्वामी मठ ते बहादूर शेख नाका या प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर एप्रिल महिन्यात अत्यंत घाईघाईने केलेल्या डांबरीकरणाचे परिणाम पहिल्याच पावसात दिसून आले आहेत. निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे अवघ्या तीन महिन्यांत या रस्त्यावर खडी पसरू लागली आहे, तर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. या कामांसाठी एकत्रित सुमारे पाच कोटींचा निधी खर्च झाला आहे. याविषयी नगर परिषदेने गंभीरपणे दखल घेत संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावल्या आहेत.
चार वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख सात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. त्यावेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी नगर परिषदेची सूत्रे हाती घेताच या कामांकडे लक्ष दिले होते. त्याशिवाय काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या कामी अधिक लक्ष दिले होते. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते आजही टिकून आहेत. मात्र, त्यानंतर शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले. तीन वर्षांत शहरातील बहुतांशी भागातील रस्ते झाले. त्यातील पाग भागातील अंतर्गत रस्त्यांविषयी ओरड झाली. सुमारे दोन कोटी रुपये खर्चातून ही काम झाली. मात्र, त्यानंतर यावर्षी झालेल्या डांबरीकरणातील कामांविषयी ओरड सुरू झाली आहे.
शहरातील स्वामी मठ ते बहादूर शेख नाका या प्रमुख रस्त्याचे एप्रिल महिन्यात घाईघाईत डांबरीकरण झाले. सुमारे एक कोटी २० लाखांचे अंदाजपत्रक होते. ठेकेदार सुरेश चिपळूणकर यांच्या एस. एम. चिपळूणकर कंपनीने साधारण १७ टक्के कमी दराने हे काम केले. काही नगरसेवकांच्या उपस्थितीत हे काम केले गेले. यावेळी बांधकाम सभापती मनोज शिंदे यांनी या कामाच्या दर्जाविषयी आक्षेप घेत लेखी तक्रार दिली होती. त्यावरून नगर परिषदेत जोरदार राजकारण शिजले होते. याप्रकरणी शिंदे यांची बदनामीही केली गेली. यावेळी काहींनी ठेकेदाराची पाठ थोपटून घेत काम पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. मात्र, आता याच रस्त्याची खडी पसरू लागल्यानंतर सारेच चिडीचूप झाले आहेत. याच पद्धतीने शहरातील वाणीअळी परिसरात सोनाली कन्स्ट्रक्शनमार्फत डांबरीकरण केले; परंतु हे काम सुरू असतानाच डांबरीकरणाचा दर्जा पाहून स्थानिक नागरिकांनी काम अर्ध्यावर थांबवले होते. त्यामुळे या रस्त्यावर हॉटमिक्सचा थर देण्यात आला नाही. तरीसुद्धा सद्य:स्थितीतील रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता नागरिकांनी घेतलेला आक्षेप योग्य होता, असे सिद्ध झाले आहे.
------------------------------
चिपळूण शहरातील स्वामी मठ ते बहादूर शेख नाका या प्रमुख रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण केले गेले आहे. त्यामुळे हा रस्ता इतक्या लवकर खराब व्हायला नको होता. संबंधित ठेकेदार एस. एम. चिपळूणकर यांना तात्काळ नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, लवकरच याविषयी योग्य ती कारवाई केली जाणार आहे.
-परेश पवार, नगर अभियंता, चिपळूण.
---------------------------
यावर्षी शहरातील स्वामी मठ ते बहादूर शेख नाका या एकमेव प्रमुख रस्त्याचे डांबरीकरण झाले. या रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने दर्जेदार काम व्हावे यासाठी आपले प्रयत्न होते. मात्र, या कामी आपली विनाकारण बदनामी केली गेली. आता त्याच रस्त्यावर खडी पसरली असून काही दिवसांत खड्डेही पडतील. त्यामुळे तेव्हा ठेकेदाराच्या बाजूने बोलणारे आता का गप्प बसले आहेत?
-मनोज शिंदे, बांधकाम सभापती, नगर परिषद, चिपळूण.
--------------------------------
शहरातील मार्कडी स्वामी मठ ते बहादूर शेख नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात आले होते. मात्र, पावसाळ्यात या मार्गावरील काही ठिकाणी गुळगुळीत सरफेस कच्चा झाला आहे. या रस्त्याच्या कामासंदर्भातील ३ वर्षांची हमी आपली असून पावसाळ्यानंतर जिथे जिथे रस्ता खराब झाला आहे. तो सुव्यवस्थित केला जाईल. तसे पत्र नगर परिषदेला देखील दिले जाणार आहे.
-सुरेश चिपळूणकर, ठेकेदार, एस. एम. चिपळूणकर कंपनी.
----------------------------
या रस्त्यांचे नव्याने हॉटमिक्स डांबरीकरण झाले
मार्कडी स्वामी मठ ते बहादूर शेख नाका रस्ता, बाजारपूल ते गोवळकोट तिठा, जिप्सी कॉर्नर ते शंकरवाडी चौक, खेंड-कानसेवाडी, नाथ पै चौक ते अलवारे बिल्डिंग, ग्रीन पार्क ते खेराडे कॉम्प्लेक्स, गुहागर नाका, प्रभात रोड ते स्वागत हॉटेल रस्ता, वाणीआळी ते रेल्वे स्टेशन पूल (गांधारेश्वर) आदी कामे करण्यात आली.