असगोली (ता. गुहागर) : गुहागर तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवत श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्यां बगाडा सोहळ्यासाठी जिल्हाभरातून भक्तांनी गर्दी केली होती. श्री व्याघ्रांबरी देवीचा उत्सव कार्तिक कृ. दर्श अमावास्येला असतो. दरवर्षी देवीचे नवस फेडण्यासाठी भक्त अंगाला आकडे टोचून घेत लाटेवर फिरतात. सायंकाळी आकडे टोचणे व लाट फिरवण्याचा कार्यक्रम मंदिराच्या प्रांगणात पार पडला.
गुहागर तालुक्यातील हा बगाडा उत्सव म्हणजे भक्तांची जणू परीक्षाच म्हणावी लागेल. स्वत:चा संपूर्ण देह हा देवीच्या श्रध्देपोटी दोन लोखंडी हुकांवर काही काळ लाटेवर टांगता ठेवणे आणि आपला नवस पूर्ण करणे असे या उत्सवाचे स्वरुप आहे.
भाविकांसाठी हा अपार श्रध्देचा विषय ठरतो. मंदिराच्या प्रांगणात सुमारे तीस फूट उंचीच्या खांबावर तेवढ्याच लांबीची सागवानी लाट फिरवली जाते. ज्या भक्तांचे नवस फेडायचे आहेत, ते स्वत: किंवा देवीचे मानकरी यांच्यामार्फत तो पूर्ण करतात.
यावेळी मानकरींच्या पाठीमागे धातूचे हूक टोचून उंचावरुन फेऱ्या मारणारे मानकरी व नवस फेडणारे भाविक अधांतरी फेऱ्या मारतात तसेच घंटा वाजवत देवीचा नामघोष करत फेऱ्या मारतात.
नवस फेडणाऱ्या भक्तांच्या पाठीला हा आकडा टोचला जातो. आकडा टोचल्यानंतर त्या भागातून कोणत्याही प्रकारे रक्त येत नाही किंवा भक्ताला कोणतीही इजादेखील होत नाही, हे नरवण येथील बगाडा उत्सवाचे खास वैशिष्ट्य आहे. नवस फेडणारे भाविक हे लाटेवरुन पाच फेऱ्या पूर्ण करुन आपला नवस फेडतात.लाटेवर फिरताना देवीचा जयजयकारभक्ताला लाटेवर चढवले जाते. त्याच्या हातामध्ये देवीची मोठी घंटा दिली जाते आणि हा भक्त लाटेवर फिरताना देवीचा जयजयकार करीत असतो. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला असणारे ग्रामस्थ ही लाट प्रांगणात गोलगोल फिरवण्याचे काम करीत असतात. पाच फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर भक्ताला लाटेवरुन खाली घेतले जाते व देवीला नमस्कार केला जातो.