लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : काेराेनाचे नियम धाब्यावर बसवून धनजी नाका येथे व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर नगर परिषदेकडून बुधवारी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर गुरुवारी भाजी विक्रेत्यांनी याठिकाणी बसणेच टाळले. त्यामुळे गुरुवारी परिसरात शुकशुकाट पसरला हाेता.
काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, बुधवारी रत्नागिरी शहरातील बहुतांशी भागात माेठ्या प्रमाणात गर्दी उसळली हाेती. शहरातील धनजी नाका परिसरात रस्त्याच्या बाजूला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडे तर खरेदीसाठी माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती. त्यानंतर नगर परिषदेच्या पथकाने या भागातील भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करीत नियमांचे पालन करण्याची सक्त सूचना केली. या कारवाईनंतर गुरुवारी भाजी विक्रेत्यांनी परिसरात बसणेच टाळले. उपविभागीय पाेलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यासह शहर पाेलीस निरीक्षक अनिल लाड, सहाय्यक पाेलीस निरीक्षक विजय जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठाेंबरे यांच्यासह पाेलीस कर्मचारी व नगर परिषदेचे कर्मचारी तैनात हाेते. त्यामुळे गर्दी नियंत्रणात आली हाेती. बाजारात हाेणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे आता यापुढे अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी सांगितले.
...............................
रत्नागिरी शहरातील धनजी नाका येथे बुधवारी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर गुरुवारी या भागात शुकशुकाट पहायला मिळाला. (छाया : तन्मय दाते)