राजापूर : कडक उन्हामुळे नैसर्गिक जलस्राेत आटलेले असतानाच राजापूर शहरानजीकच्या गंगातीर्थ क्षेत्री गंगेचे आगमन झाले आहे. ऐन उन्हाळ्यातच गंगेचे आगमन झाल्याने भाविकांची पावले गंगातीर्थ क्षेत्री वळली आहेत. सध्या शिमगोत्सवानिमित्त मुंबईकर गावी आले आहेत. त्यामुळे सुटीसाठी गावी आलेले मुंबईकर गंगातीर्थाला भेट देत असल्याने गर्दी वाढली आहे.
सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी गंगा प्रकट होते व जवळपास तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते असा प्रघात आहे. मात्र, अलीकडच्या कालावधीत तिच्या आगमन व निर्गमनच्या सर्वसाधारण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. काही वर्षे तर ती सलग आली होती. काही वर्षांपूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही खूप लांबला होता. सातत्याने गंगामाई प्रकट होत असल्याने पूर्वीचा भाविकांचा ओढा कमी झाला आहे.
तीन वर्षांपूर्वी दि. ३० एप्रिल २०२१ रोजी गंगामाईचे आगमन झाल्यानंतर मार्च २०२२ पासून गंगामाईचा प्रवाह काहीसा कमी झाला होता. गायमुखातून वाहणारे पाणी बंद झाले होते. मात्र, गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने भरलेली हाेती. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर १५ मे २०२२ पासून पुन्हा गंगामाईचा प्रवाह वाढला व गायमुखही प्रवाहित झाले होते. तेव्हापासून गंगामाईचा प्रवाह अखंडितपणे सुरू होता. मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये पुन्हा गायमुखातून वाहणारा प्रवाह बंद झाला होता.त्यानंतर आता रविवार, दि. २४ मार्च रोजी पुन्हा गायमुख प्रवाहित झाले असून, मूळ गंगेसह सर्व कुंड पाण्याने भरलेली आहेत. सध्या तालुक्यात शिमगोत्सवाची धामधूम सुरू असून, मोठ्या संख्येने मुंबईकर दाखल झाले आहेत. अशावेळी गंगामाईचे आगमन झाल्याने गंगाक्षेत्री भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.