गणपतीपुळे : पावसाची संततधार सुरू असतानाही रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी झाली हाेती. सुमारे ९० हजार भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, इचलकरंजी, इस्लामपूर, जत, कवठेमहाकाळ, मिरज, कऱ्हाड, बेळगाव, इचलकरंजी आदी ठिकाणच्या भाविकांनी याठिकाणी हजेरी लावली हाेती.अंगारकी संकष्ट चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी साेमवारी रात्री एक वाजल्यापासून रांगा लावण्यात आल्या हाेत्या. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता स्वयंभू गणेश मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्या हस्ते ‘श्रीं’ची महापूजा, मंत्र पुष्पांजली झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात आले. पावसामुळे भाविकांसाठी पत्र्याची शेड उभारण्यात आली हाेती. तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायतीतर्फे संपूर्ण मंदिर परिसरात विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली होती. वाहनांची गर्दी लक्षात घेऊन सागर दर्शन पार्किंग वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
देवस्थान समितीकडून सायंकाळी ४.२० वाजता ‘श्रीं’ची ढोल-ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत देवस्थानचे सरपंच डॉ. श्रीराम केळकर व सर्व पंच, पुजारी अमित घनवटकर, देवस्थानचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व भाविक सहभागी झाले होते. रात्री चंद्रोदयानंतर ११ वाजता मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले.
गर्दीवर लक्षयात्रा उत्सव सुरळीत व शांततेत पार पडण्यासाठी गणपतीपुळे देवस्थान समिती, ग्रामपंचायत गणपतीपुळे व पोलिस यंत्रणा लक्ष ठेवून हाेती. याठिकाणी ५ पोलिस अधिकारी, ७० पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गर्दीवर लक्ष ठेवून हाेते.
वैद्यकीय पथक तैनातमालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संजय बारिंगे, अक्षता शिरसेकर, कुणाल मांडवकर, राहुल जाधव, सांची गवाणकर, सारिका गवाणकर, मृण्मयी गुरव, मनीषा बोडेकर, स्वप्नाली बोडेकर, वृषाली रावणांग, सिद्धी लिंगायत, सलोनी अवसरे, सलोनी नाटेकर, तेजस्विनी पालीये यांनी आरोग्य सेवा पुरविली हाेती.