चिपळूण : गणपतीसाठी आलेल्या मुंबईकरांना चिपळूणमधून साेडण्यात येणाऱ्या एस. टी. बसेसबराेबरच डेमू रेल्वेही अपुरी पडली आहे. खास चिपळुणातून सुटणारी चिपळूण - दिवा डेमू रेल्वेला प्रवाशांची प्रचंड गर्दी हाेत आहे. एस.टी. बस, विशेष उत्सव रेल्वे, खासगी आराम बस, कार अशा विविध माध्यमातून गणेशभक्त उत्सवाला गावी आले हाेते. मात्र, परतीच्या प्रवासात व्यवस्था न झाल्याने लोकांचे हाल हाेत आहेत.
चिपळूण एस. टी. आगारात गौरी गणपतीच्या विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाठी प्रवाशांची गर्दी हाेत आहे. त्यामुळे गेले दोन दिवस चिपळूण बसस्थानक व चिपळूण रेल्वे स्थानक गर्दीने फुलून गेले आहे. गणेशभक्तांची हाेणारी गर्दी लक्षात घेऊन दिवा ते चिपळूण ही डेमू रेल्वे सोडण्यात आली आहे. या रेल्वेने अनेकजण गावी आले. परतीच्या प्रवासासाठी ही रेल्वे सध्या धावत आहे. दररोज चिपळूण स्थानकातून दुपारी १ वाजता सुटणाऱ्या या गाडीलाही प्रवाशांची गर्दी हाेत आहे.
प्रवाशांच्या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना सावंतवाडीकडून येणाऱ्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागले. त्यातच रेल्वेचे वेळापत्रक दोन ते चार तास कोलमडल्याने प्रवाशांची गैरसोय हाेत आहे. काहींनी रेल्वेत जागा मिळत नाही म्हणून रेल्वे स्थानकावरून काढता पाय घेत चिपळूण बसस्थानक गाठले आणि जादा एसटी अथवा खासगी गाड्यांचा पर्याय शोधला आहे