राजापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार गुरुवारी राजापूर शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत सुरू झाले. त्यामुळे राजापूरच्या बाजारपेठेत खरेदीदारांची गर्दी झाली हाेती. तालुक्याच्या विविध भागांतील बाजारपेठातही खरेदीदारांची लगबग पाहायला मिळाली.
जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. या कार्यकालात मेडिकल सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते़ आठ दिवसांच्या कडकडीत बंदमुळे राजापूर शहरासह तालुक्याच्या विविध भागांत शांतता होती. ठिकठिकाणी वर्दळीची ठिकाणेही शांत होती.
लॉकडाऊनची मुदत बुधवारी मध्यरात्री समाप्त झाली आणि प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करीत गुरुवारी बाजारपेठा सुरू झाल्या. मात्र, यामध्ये कापड व्यापारी, सोन्याचांदीचे व्यावसायिक व अन्य व्यवसाय वगळता उर्वरित व्यवहार सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत सुरू झाले होते. प्रदीर्घ काळानंतर अनेक दुकाने उघडल्याचे पाहायला मिळाले, तर आठवड्यानंतर राजापूरच्या बाजारपेठेत खरेदीदारांची लगबग पाहायला मिळाली होती. सदैव वर्दळीच्या जवाहर चौकातही गुरुवारी काहीशी वर्दळ हाेती़