चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केला तरी बाधित रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे शासनाकडून पुन्हा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने बुधवारी नागरिकांनी आवश्यक किराणा माल, चिकन, मटण व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. मात्र, दुपारनंतर पूर्ण बाजारपेठ बंद होती.
तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तालुक्यात ११९१ रुग्ण अॅक्टिव्ह असून, त्यांच्यावर विविध शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्यात ४४१७ रूग्ण कोरोनाबाधित झाले असून, त्यातील ३१५१ रुग्ण बरे झाले आहेत. एकीकडे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना रस्त्यावरील नागरिकांची वर्दळ कमी झालेली नाही. गुरूवारपासून कडक लॉकडाऊन होण्याच्या भीतीने बुधवारी सकाळपासूनच किराणा व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. अनेकजण नक्की उद्यापासून लॉकडाऊन सुरू होणार आहे का, अशी चौकशी व्यापाऱ्यांकडे करीत होते.
शहरासह खेर्डी, सावर्डेवर निर्बंध
बुधवारी दुपारनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आदेशानुसार ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यानुसार
चिपळूण शहर, खेर्डी आणि सावर्डे येथे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. या तिन्ही ठिकाणी किराणा व बेकरी दुकाने उघडण्यास बंदी घालण्यात आली आहे. उर्वरित गावात किराणा दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.