लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊननंतर सोमवारी मंडणगड शहराची बाजारपेठ पुन्हा एकदा सुरू झाली. त्यामुळे जीवनावश्यक सामानाच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली हाेती.
दाेन दिवस स्थानिक तालुकावासीय घराबाहेर पडलेले नसल्याने पोलीस यंत्रणेवरही फारसा ताण आला नाही. सोमवारी तालुक्यातील सर्व दुकाने सुरू झाली होती. मात्र, दुपारी १२नंतर प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सुरू दुकाने बंद केली. त्यामुळे बाजारातील गर्दी पुन्हा ओसरली हाेती.
महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपंचायत प्रशासन व आरोग्य विभाग यांची मंडणगड तहसील कार्यालयात तातडीने बैठक घेऊन बंदच्या कार्यवाहीच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे दुपारी बारानंतर पोलीस प्रशासनाने शहरात गाडीतून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यानंतर दुकाने बंद करण्यात आली. अनावश्यक दुकाने उघडलेल्यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्याकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, आगामी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बदलेल्या पवित्र्यामुळे त्रस्त झालेल्या शहरातील व्यापाऱ्यांनी या संदर्भात तहसील कार्यालयात निवेदन सादर करत आपल्या व्यथा मांडल्या. शासनाच्या सततच्या बदलणाऱ्या भूमिकेमुळे शहरातील व्यापारी अडचणीत आल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांना योग्य ते सहकार्य प्रशासनाने करण्याची मागणी करण्यात आली.