चिपळूण : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेला कडक लॉकडाऊन संपल्यानंतर गुरूवारी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली. शनिवारी व रविवारी दोन दिवस पुन्हा बाजारपेठ बंद राहणार असल्याने विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. यावेळी ‘सोशल डिस्टन्स’चा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हा प्रशासनाने ९ जूनपर्यंत आठवड्याचा लाॅकडाऊन लागू केला होता. मेडिकल व दवाखाने वगळता सर्व सेवा, व्यवसाय व दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र, बुधवारी लॉकडाऊन संपल्यानंतर गुरूवारी किराणा, भाजीपाला, मटण व मच्छी मार्केटची दुकाने, प्लास्टिक कापड, आदी दुकाने उघडण्यास प्रशासनाने मान्यता दिली होती. त्यामुळे शहरातील नागरिक विविध वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले. आठवडाभर पुरेल इतका किराणा माल, धान्य, तसेच विविध आवश्यक साहित्याची खरेदी त्यांनी केली. त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. विशेषतः बाजारपेठेतील पानगल्ली, नाथ पै चौक, गांधी चौक, जुने बसस्थानक, चिंचनाका व मार्कंडी येथे मोठी गर्दी झाली होती.
येथील बँकाही आठ दिवस सर्वसामान्यांसाठी बंद होत्या. केवळ शेतकऱ्यांनाच बँकेत व्यवहार करण्याची मुभा दिली होती. लॉकडाऊन उठल्यानंतर बँकेतील पैसे काढणे, जमा करणे, आदी विविध बँकिंग कामांसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. शहरातील मुख्य बाजारपेठेत नागरिकांची जास्त गर्दी होऊ नये, यासाठी वाहनांना बंदी केली होती. अलिकडेच दुचाकी पार्किंग करून नागरिकांना बाजारपेठेत खरेदीच्या कामासाठी पोलिसांकडून सोडले जात होते. चौका-चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, लोक साहित्याच्या खरेदीसाठी बाहेर पडल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती. जे दुचाकीस्वार विनाहेल्मेट फिरत होते, त्यांच्यावर मात्र कारवाईचा बडगा उगारला जात होता. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी व रविवारी पुन्हा संचारबंदी लागू केल्याने लोकांनी गुरूवारी खरेदीवर जास्त भर दिला होता. त्यामुळे दीर्घकाळानंतर बाजारपेठ फुलल्याचे पाहायला मिळाले.
--------------------
चिपळूण बाजारपेठेतील पानगल्ली येथे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.