शिवाजी गोरेदापाेली : काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने याहीवर्षी ३१ डिसेंबरच्या जल्लाेषावर मर्यादा आल्या आहेत. पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, बंदी झुगारून दापाेलीच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्य पर्यटकांनी दापोलीला पसंती दिली आहे. त्यामुळे समुद्रकिनारे फुल्ल झाले आहेत. काेराेनाची रुग्णसंख्या वाढताच नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. सुधारित नियमानुसार रात्री ९ वाजेपर्यंत स्पीकर किंवा डीजेच्या माध्यमातून आपला उत्सव साजरा करता येईल. मात्र, त्यानंतर सकाळी ५ वाजेपर्यंत कोणताही कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच किनाऱ्यावरही फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
निर्बंध लागू हाेण्यापूर्वीच पर्यटक दापाेलीत दाखल झाल्याने हॉटेल फुल झाली आहेत. त्याचबराेबर शनिवार, रविवार सलग दोन दिवस पुन्हा सुट्या लागून आल्याने १ जानेवारी ते २ जानेवारी समुद्र किनाऱ्यावरचे रिसॉर्ट बऱ्यापैकी फुल्ल असणार आहेत. त्यामुळे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आम्ही नियमांचे पालन करून नवीन वर्ष साजरे करू, अशी प्रतिक्रिया अनेक पर्यटकांनी यावेळी व्यक्त केली.