पाचल : आपल्या अवतीभोवती असणाऱ्या औषध वनस्पतींचे संवर्धन करा. आपल्या अवती-भवती अनेक वनस्पती आहेत; पण त्या रोज पाहत असूनही त्यांच्यात असणाऱ्या औषध गुणधर्मांची माहिती नसल्यामुळेच आपण त्या उपटून टाकतो. अडुळसा, रुई, अमरवेल, आवळा अशा अनेक वनस्पती आहेत की, ज्यांच्यात खूप मोठे औषध गुणधर्म आहेत. या वनस्पती ओळखून त्यांचे संवर्धन करा, असे प्रतिपादन प्रा. एन. जी. देवन यांनी केले.
ते श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. विभाग आयोजित ‘औषध वनस्पतींची ओळख व वनसंवर्धन’ या विषयावरील ए. दिवसीय कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम हे होते. दुसऱ्या सत्रात प्रा. एन. जी. देवन यांनी औषध वनस्पतींची माहिती व त्यांच्यातील औषध गुणधर्म यासंदर्भात माहिती दिली. तिसऱ्या सत्रात परिसरातील औषध वनस्पतींची ओळख प्रा.एन. जी. देवन यांनी करून दिली. प्राचार्य डाॅ. पी. एस. मेश्राम म्हणाले की, अशा औषध वनस्पतींची जपणूक आपण केली तरच भविष्यात आपल्याला सहज सुलभपणे औषधे मिळविता येतील. त्यासाठी सर्वांनी या औषध वनस्पतींची जपणूक करावी व इतरांनाही त्याविषयी माहिती द्यावी. त्यामुळे या वनौषधींचे सहज सुलभपणे संरक्षण होईल. त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेऊया, असे आवाहन मेश्राम यांनी केले.
---------------------------------
राजापूर तालुक्यातील पाचल येथील खापणे महाविद्यालयात प्रा. एन.जी. देवन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम हे हाेते.