चिपळूण : शहरातील पाग येथील युनिटी रिक्षा स्टँडनजीकच्या नाल्याचा संरक्षक कठडा कोसळून अनेक महिने ओलांडले, तरीही त्याची दयनीय अवस्था जैसे थे आहे. नगरपरिषदेतर्फे केवळ थातुरमातुर मलमपट्टी केली जात असल्याने, नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या महावितरण कंपनीच्या कार्यालयाशेजारी पाग परिसरातून वाहणारा जुना नाला आहे. या नाल्याला लागूनच रस्ता आहे. पाग परिसरात मोठी वस्ती असून, नागरिक या रस्त्याने ये-जा करतात. काही महिन्यांपूर्वी युनिटी रिक्षा स्टँडनजीक असणारी नाल्याची संरक्षक भिंती कोसळली. स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरपरिषद प्रशासनाला कळविले होते. मात्र, त्यावेळी नगरपरिषदेने कोसळलेल्या संरक्षक भिंतीशेजारी पत्र्याचे ड्रम व त्यांनतर लाकडी बांबू लावण्यापलीकडे काहीच केले नाही. मात्र, अतिवृष्टीच्या काळात तेथील जमीन पुन्हा खचली. त्यामुळे ते ड्रम थेट नाल्यात जाऊन सुरक्षिततेसाठी बांधलेले लाकडी बांबूही खाली कोसळले होते.
या नाल्याशेजारीच वस्तीकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. मात्र, कोसळलेल्या संरक्षक भिंतीमुळे या रस्ताची बाजूही ढासळू लागली आहे. त्यामुळे या परिसरात अपघात घडून वाहनधारक गंभीर जखमी होत आहेत. नगरपरिषद प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने, आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांनी उपोषण करण्याचा निर्धार नयनेश तांबडे, सुनील पवार, विश्वास चितळे, संजय गोरिवले, अनंत जाधव, विवेक गिजरे, महेश शिंदे, शिवाजी शिंदे, संदेश गोरिवले, फारूख झारे आदींनी केला आहे.