रत्नागिरी : जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीला दिनांक २ ते ३ जून या कालावधीत चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून दिनांक ३ जून २०२० रोजी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ३४ प्रमाणे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदी जाहीर केली आहे.या आदेशानुसार लोकांना त्यांच्या अत्यावश्यक सेवा विषयक बाबीसाठी वगळून अन्य कोणत्याही गोष्टीसाठी जिल्ह्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी संचार करण्यास बंदी करण्यात आली आहे. या कालावधीत लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असून लोकांनी घरातच सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.समुद्रामध्ये जाऊ नयेया कालावधीत लोकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. त्याचबरोबर समुद्रात वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये. मच्छिमारांनी आपल्या बोटींचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षितपणे बांधून ठेवण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात.नागरिकांनी हे करावे
- घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे.
- घराच्या अवती भवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब रहावे.
- आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे.
- केरोसीनवर चालणारे बंदिस्त दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.
- हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.
- नागरिकांनी सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.
तर इथे संपर्क साधावाअतिवृष्टी व चक्रीवादळ याचा एकत्रित फटका टाळण्यासाठी समुद्रकिनारी व नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी. ग्रामकृतीदलाच्या सुचनेनुसार व जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सुरक्षित उपाययोजना कराव्यात.
मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत, तहसीलदार कार्यालय, जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२३५२- २२६२४८, २२२२३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.