मंडणगड : तौउते चक्रीवादळाचा फटका मंडणगड तालुक्यातील समुद्र आणि खाडीकिनारी असणाऱ्या गावांना चांगलाच बसला आहे. वादळात तालुक्यातील एकूण २९७ घरांचे नुकसान झाले असून, त्यापैकी चार घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत़ तसेच पाच शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे. या वादळात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे २१ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत सुमारे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, अजूनही उर्वरित पंचनाम्यांचे काम सुरू असल्याची माहिती मंडणगडचे तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांनी दिली.
ताैउते चक्रीवादळापूर्वी प्रशासनाने समुद्र व खाडीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता़ त्यामुळे ५०८ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. वादळामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात एकूण २९७ घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पेवे येथील २, वेळास येथील १, तर सावरी येथील १ अशी चार घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत़ तालुक्यातील पन्हाळी बुद्रुक, दाभट बौद्धवाडी, लाटवण व म्हाप्रळ येथील शाळांच्या इमारतींचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील मौजे शिपोळे बंदर, कोंझर धनगरवाडी, सुरले, आंबवली, साखरी या गावांना या वादळाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. आर्थिक नुकसानीचा हा आकडा जवळपास २१ लाखांपर्यंत आहे. शासनाच्या सुधारित शासन निर्णयाप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणे नुकसानग्रस्त लोकांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती तहसीलदार वेंगुर्लेकर यांनी पत्रकारांना दिली.