लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील पूर्व विभागास तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वादळाच्या तडाख्यात अनेकांच्या घरावरील पत्रे, कौले उडून गेलीत. तर काही ठिकाणी मोठे वृक्ष घरावर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही. पडझड मात्र मोठ्या प्रमाणात झाली.
तालुक्यातील आकले सुतारवाडी येथील घरांचे, पेढे कोष्टेवाडीतील मंगेश मोहिते यांच्या घराचे पत्रे उडाले. टेरव येथील गौऱ्या वामन साळवी यांच्या घराची कौले पडून नुकसान झाले. मौजे पोसरे येथील फैरोजा खोत यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. नांदिवसे राधानगर येथील किरण चव्हाण, पेढे पानकरवाडी येथील अरविंद मोरे, पोफळी येथील अंकुश सूर्याजी पवार व परशुराम येथील अतुल जोशी यांच्या घरांचे नुकसान झाले.
कोळकेवाडीतील श्रमिक सहयोग संस्था, खरवते प्राथमिक आरोग्य केंद्र, पोफळी नाका येथील सार्वजनिक शौचालयाचे पत्रे उडाले, तेथीलच स्मशानशेडचेही नुकसान झाले आहे. पोफळी नाक्यातीलच सुमित्रा दगडू डांगे यांच्या घराची भिंत पडली. त्यांना स्थलांतरित केले आहे.
याशिवाय तोंडली, वहाळ, आगवे, पालवण, पाचाड, कात्रोळी, खोपड, मोरवणे, निर्व्हाळ, कोंडमळा, शिरगांव, दोनवली, नांदगाव बु., रावळगाव, पेढांबे, कळकवणे, धामणवणे, परशुराम, कळंबस्ते, खेर्डी आदी गावांमध्ये घरे व गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
------------------
उतेकर कुटुंबीयांवर अस्मानी संकट
काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील पिंपळी खुर्द कदमवाडी येथील सुभाष जयसिंग उतेकर यांनी कर्ज काढून आपल्या घराची दुरुस्ती केली होती. हे काम नुकतेच पूर्णत्वास गेले होते. अशातच तौक्ते चक्रीवादळ रूपाने आलेल्या अस्मानी संकटाचा फटका या कुटुंबाला बसला. त्यांच्या घराशेजारी असलेल्या इंदुलकर यांच्या हद्दीतील आंब्याचे झाड घरावर कोसळले. त्यामध्ये नवीन बांधकाम मोठे नुकसान झाले आहे.
-------------------
२४ तासात १०० मिलीमीटर पावसाची नोंद
तौक्ते चक्रीवादळाच्या निमित्ताने सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. २४ तासात ९९.२२ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. चिपळूण परिसर, मार्गताम्हाणे, शिरगाव, कळकवणे आदी भागात सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. आतापर्यंत एकूण १२४.०८ इतका पाऊस झाला आहे.
-------------------------------
चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रूक येथील घरावर वृक्ष कोसळून नुकसान झाले आहे.